रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला भीषण अपघात; चार प्रवाशांचा मृत्यू, १०० जण जखमी
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बिहारमधील बक्सरमधील रघुनाथपूर स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून घसरून भीषण अपघात झाला. दिल्लीहून कामाख्या जात असलेल्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला बिहारच्या बक्सर जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून १०० प्रवाशी जखमी झाले आहेत. ट्रेन या ठिकाणी पोहोचताच आठ डबे रुळावरून उतरल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. या अपघातात अनेक प्रवाशी डब्यात अडकल्याचं सांगितलं जात होतं. रात्र असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केलं. दरम्यान, अपघात का झाला याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बक्सरहून १० रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तसेच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.